०१ ) आरंभिक जन्माला येताना एकटाच जरी आला असला तरी पृथ्वीवर वावरताना मात्र माणसाला समूहाची गरज असते . वाढ वृद्धि असो किंवा संगोपन संवर्धन असो तेथे अनेकांचा संबंध हा येतच असतो . परस्परांच्या सहवासातून सर्वांगीन गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नालाच आपण ' जगणं ' असं मानत असतो . खरंतर ' जन्म ' आणि ' मृत्यू ' हे दोन्ही शब्द माणसाच्या जीवनाची दोन भिन्न टोके आहेत . जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू . एक आरंभाचा क्षण आहे तर दुसरा अंतिम क्षण . पण पहा ना हे जन्म आणि मृत्यू दोन्ही शब्द किती गुंतागुंतीचे आहेत . जोडल्या शिवाय जन्म होत नाही आणि मोडल्या शिवाय मृत्यू होत नाही . पण या दोन्ही शब्दाच्या मधला शब्द आहे तो म्हणजे ' जगणं '. किती साधा आणि सरळ आहे . या शब्दाला कुठेच काना नाही की मात्रा नाही . उकार नाही की वेलांटी नाही . जेव्हा जगणं असं साधं आणि सरळ असतं तेव्हा ...