Skip to main content

स्वावलंबनाचे व ग्रामस्वच्छतेचे अग्रदूत श्रीचक्रपाणि प्रभू

 ०१) आरंभिक 

       जन्माला येताना एकटाच जरी आला असला तरी पृथ्वीवर वावरताना मात्र माणसाला समूहाची गरज असते. वाढ वृद्धि असो किंवा संगोपन संवर्धन असो तेथे अनेकांचा संबंध हा येतच असतो. परस्परांच्या सहवासातून सर्वांगीन गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नालाच आपण  'जगणं' असं मानत 

असतो.

          खरंतर 'जन्म' आणि 'मृत्यू' हे दोन्ही शब्द माणसाच्या जीवनाची दोन भिन्न टोके आहेत. जशा एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक आरंभाचा क्षण आहे तर दुसरा अंतिम क्षण. पण पहा ना हे जन्म आणि मृत्यू दोन्ही शब्द किती गुंतागुंतीचे आहेत.जोडल्या शिवाय जन्म होत नाही आणि मोडल्या शिवाय मृत्यू होत नाही. पण या दोन्ही शब्दाच्या मधला शब्द आहे तो म्हणजे 'जगणं'. किती साधा आणि सरळ आहे.या शब्दाला कुठेच काना नाही की मात्रा नाही. उकार नाही की वेलांटी नाही. जेव्हा जगणं असं साधं आणि सरळ असतं तेव्हा ते निर्मळ आणि प्रभावी ठरतं.

    अशा आदर्श  जीवनाला ईश्वरी धर्माचा परीसस्पर्श लाभतो तेव्हा ते सर्वांसाठी वंदनीय ठरंतं. सत्य सनातन ईश्वरीय ज्ञानोक्त  मार्गाचं आचरण घडतं तेव्हा तो जीव कैवल्याच्या मार्गाने ईश्वरप्राप्तीला पोहोचत असतो. तो त्याच्या जीवनाचा परमोत्कर्षक मोक्षमार्ग असतो.

          बंधयुक्त जीवाला बंधमुक्त करून उद्धारक मार्गाने घेऊन जाणाऱ्या श्री चक्रपाणि राऊळांच्या जीवन कार्याचं वैशिष्टपूर्ण चिंतन प्रस्तुत लेखात आपण करणार आहोत.

 

०२)तत्कालीन परिस्थिती 

     ज्या कालखंडात ईश्वर अवतार धारण करत असतो तो कालखंड आणि त्याची पार्श्वभूमी याठिकाणी समजून घेणे अगत्याचे असते. त्याशिवाय त्या अवताराच्या कार्याचे यथार्थ चिंतन घडू शकत नाही. श्री चक्रपाणि प्रभूंचा अवतार ज्या कालखंडात महाराष्ट्राच्या मातीत अवतरला तो कालखंड होता शालिवाहन शकाचा ११  व्या शतकातील कालखंड.     

       देवगिरीच्या यादव घराण्याची साम्राज्यसत्ता महाराष्ट्रावर नांदत होती.या राजघराण्यावर ब्रह्मसत्तेचा निरंकुश पगडा होता.वैदिक कर्मकांडाचे प्रचंड प्राबल्य माजलेले होते

मानवतेची तर राखरांगोळी होऊन संपूर्ण मूल्यव्यवस्थाच हरवलेली होती.देव-देवतांच्या व्रतवैकल्यांचा तर फारच सुळसुळाट झालेला होता. सर्वसामान्य समाज अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत खितपत पडलेला होता. विवेकहीन विचारामुळे जातिव्यवस्था चातुर्वर्णाच्या स्पृश्यास्पृश्यतेच्या हरवलेली होती. अस्पृश्यांची सावलीही विटाळ मानणाऱ्या विचित्र अशा समाजात प्रचंड आर्थिक दारिद्र्य नांदत होतं. सर्वार्थानं जनसामान्यांची अडवणूक आणि नागवणूक होत होती. अशा खचलेल्या,पिचलेल्या समाजाला सात्विक आणि समंजस आश्वासक आधाराची गरज होती. त्यांच्या अज्ञानामूळ संसाराच्या नाशासाठी आणि उद्धारक विचारांच्या अध्यात्म प्रतिष्ठेसाठी श्री चक्रपाणि प्रभूंचा अवतार त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या मातीत अवतरला होता.

 

०३) श्रीचक्रपाणि प्रभूंचा अवतार

      कार्तिक मासातील पर्वा निमित्त फलटण नगरीतील अनेक यात्रेकरू महाजन द्वारकेच्या यात्रेला गेलेले होते‌. तेथील वेदविद शास्त्रजाण राजनायक या विद्वान ब्राह्मणाच्या दर्शनाने सर्व लोक सुखावून गेले होते. त्यांच्या प्रबोधनाने भारावून जात होते. तेव्हा फलस्थ नगरीच्या यात्रेकरूंनी राजनायकांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी आपण फलटण येथे येण्याचे आग्रह पूर्वक निमंत्रण दिले. त्या विनंतीवरून राज नायक आणि त्यांची धर्मपत्नी राजाईसा यांचा संपूर्ण परिवार द्वारके वरून फलटण या ठिकाणी येऊन स्थिरावला.

        बाणगंगेच्या काठावरील अतिप्राचीन अशा या फलस्थ नगरीतील पश्चिमेकडील ब्रह्मपुरी च्या टेकावर भव्य वाड्यात यांच्या वास्तव्याला आणि ज्ञानदानाच्या कार्याला प्रारंभ झाला. यथावकाश या दांपत्याला रूपनायक हा सद्गुणी पुत्र प्राप्त झाला. काळानंतर आणि या रूपनायक आणि त्यांची धर्मपत्नी रुपाईसा यांना विवाहोपरांत अनुक्रमे जनकनायक, वडवनायक, ब्रम्हनायक,माननायक,काननायक,दायनायक जाननायक अशी गुणवंत सात अपत्ये झाली. सर्वात जेष्ठ पुत्र जनकनायक हे अत्यंत विद्वान आणि ग्राम जणांना विशेष प्रिय होते.पुढे त्यांचा विवाह चाकण येथील रूपवान अशा जनकाईसा हिच्या सोबत झाला. बऱ्याच प्रतीक्षेनंतरही पुत्ररत्न प्राप्त होत नाही म्हणून कुटुंबियांच्या आग्रहास्तव जनकाईसाच्या  कनिष्ठ भगिनी रंभाईसा सोबत जनकनायकांचा पुनर्विवाह झाला‌. पुत्ररत्नाची प्राप्ती झालेल्या शिवाय वैवाहिक जीवनाला परिपूर्णता प्राप्त होत नाही म्हणून जनकाईसाच्या माहेर कडिल लोकांनी चाकण येथील 'चक्रपाणि' देवतेला तर जनक नायकांच्या परिवारांनी पूर्णा नदी काठावरील 'चांगदेव' येथील अधिष्ठानाला पुत्रप्राप्तीसाठी नवस केला. कर्मधर्मसंयोगाने पुढे जनकनायकां पासून जनकाईसांना अश्विन शुद्ध नवमी शके १०४३ रोजी गुरुपुष्यामृत या पवित्र योगावर प्रश्चात प्रहरी अतिशय सुस्वरूप आणि गोंडस अशा बालकाला जन्म झाला.

 

शुभ वेळ पाहून आपापल्याल्या अधिष्ठानाच्या नवसपूर्ती नंतर नवजात नवजात बालकाला चक्रपाणि चांगदेव अशा दोन नावांचे संबोधन बारशाच्या विधीत प्राप्त झाले. जनकनायक आणि जनकाईसांच्या संमतीने श्रीचक्रपाणि प्रभुंचे बालपण रंभाईसा च्या आवारात नांदु लागले.देखण्या श्रीचक्रपाणि प्रभूंच्या दर्शनाने,स्पर्शनाने आणि संभाषणाने सर्व लोक आनंदित होऊन जात असत. त्यांच्या बाळलीळांचे कौतुक करीत असत. रांगणारं बालपण लवकरच आधाराने उभं राहत वाड्यात धाऊ लागलं. वडिलांच्या आणि आजोबांच्या वेदमंत्रांच्या श्रवणाने बालकाची वाढवृध्दी आणि जडणघडणीला प्रारंभ झाला.

 आठव्या वर्षी समारंभपूर्वक मुंजीबंधन झाल्यानंतर त्यांच्या वेदअध्ययनाला आरंभ झाला. सांगोपांग वेद शास्त्राची अभ्यास पूर्णता त्यांनी स्वीकारली.सोळाव्या वर्षापर्यंत सहा शास्त्र, विविध कला अलंकारादी कौशल्य त्यांनी हस्तगत केले.निष्णात वेद वक्तृत्वामुळे समस्त नगरजनांच्या आदराला आणि श्रद्धेला श्रीचक्रपाणि राऊळ पात्र झाले.

 

०४गृहस्थधर्माचा अंगिकार -

         सुयोग्य वेळी मात्या पित्याच्या आज्ञेने जनकाईसाच्या बंधूंची सर्वांग सुस्वरूप कमळाउसा या कन्येसोबत विधीवत श्रीचक्रपाणि प्रभूंचा विवाह झाला. मोठ्या थाटामाटात लग्न समारंभ पार पडला‌. मंगल वाद्यांच्या निनादात आणि आनंदाच्या सोहळ्यात लक्ष्मीच्या पावलाने कमळवदनेचं राजवाड्यात आगमन झालं.आधीच बहु प्रतीक्षेनंतर मुलगा झाला.त्यांनं शास्त्रात प्रावीण्य मिळवलं. आज्ञाधारकतेन गृहस्थ धर्मही स्वीकारला. आता त्याचा प्रपंच ही मार्गी लागला. सगळं कसं त्यांच्या मनासारखं घडलं म्हणून दोघाही मातापित्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. वडिलांना वार्धक्य प्राप्त झाल्याने त्यांच्या परवानगीनेच श्री चक्रपाणि प्रभूंनी परंपरागत व्यापार आणि शेती कुळवाडी याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. व्यापाराच्या निमित्ताने पुण्याकडे त्यांचं येणं-जाणं सुरू झालं. सुयोग्य आणि नेटक्या व्यवहारामुळे अल्पावधीतच सर्वत्र त्यांचा नावलौकिक झाला. शिवाय मोठ्या प्रमाणावर शेती असल्याने धोरणात्मक विचाराने स्वतः कृषी कर्मात उतरल्यामुळे भरघोस पीक पाणी येऊ लागले.शिवाय पणजोबां पासून चालत आलेलं नगर वासियांचे गुरुत्व ही श्रीचक्रपाणि महाराजांनी स्वीकारून वेदशाळेतील ज्ञानदानाच्या कर्तव्याला प्रारंभ केला

         भल्या पहाटे स्नानादी कर्म उरकून सकळ जीवांच्या चिंतनासाठी बाणगंगेच्या काठावरील श्रीकृष्ण मंदिरात ते ध्यानसाधना करीत.प्रात समयी वेदशाळेत जाऊन उपस्थितांना वेद शास्त्रातील ऋचांचं अध्यापन  करीत. प्रसंगी बाहेरून आलेल्या शास्त्र जाणत्यांसोबत शास्त्रचर्चा करून त्यांना वेदमार्गाचे महत्त्व पटवून देत. शास्त्रार्थात त्यांना पराभूत करून त्याप्रसंगी वेदमार्गाची प्रतिष्ठा ही राखत असतं.

 

०५) जनलोकांची दुःख निवृत्ती 

             पूर्वकर्माच्या आर्जकत्वानुसार जीव प्रस्तुत देहात सुखदुःखाचा भोगत असतो. परंतु 'सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताएवढे '।। म्हणून बाहुल्ये दुःखाच्याच गर्तेत तो खितपत पडतो. दुःख भोगताना व्याकुळ होतो.कारण तो कर्मभोगाने बांधलेला असतो. मात्र परमेश्वरला दयादी गुणधर्मामुळे  व्याकुळ जीवा विषयी अनुकंपा निर्माण होते.

 नगराच्या कुंभार गल्लीत आलेल्या मांत्रिकाने एकदा कुंभाराचा मडके भाजण्याचा आवा मंत्राने भारून टाकला होता. त्यामुळे आव्यातील डेरे,माठ,मडके आपोआपच फुटून जात असत. हवालदिल झालेल्या अंतकरणाने कुंभार मंडळी नगरातील आश्वासक ठिकाणी म्हणजेच श्री चक्रपाणि महाराजांकडे समस्या घेऊन पोहोचली. तात्काळ त्यांचे समाधान करीत श्री चक्रपाणि महाराज त्या गल्लीतील आव्या जवळ पोहोचले. स्वतःच्या श्रीचरणाचा पवित्र स्पर्श करीत मंत्र सामर्थ्याने त्या आव्यावरील प्रभाव त्यांनी नाहीसा केला. त्यांचं जीवन पहिल्यासारखं व्यवस्थित करून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू निर्माण केलं.

          सदोदित निसर्गचक्राच्या दुष्परिणामात दुःख भोगणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात एकदा श्रीचक्रपाणि महाराज जाऊन पोहोचले. त्याच्या शेतातील खळ्यावर चालणाऱ्या धान्याच्या राशीला कृपादृष्टीने अवलोकन करून श्रीकराने स्पर्श केला. त्यामुळे धान्याची रास अधिकाधिक वाढू लागली. अनेक बैलगाड्या जुंपून धान्य घरी नेऊनही दिवसभर धान्याच्या राशीलत किंचितही कमतरता होत नव्हती. हा हा म्हणता हे आश्चर्य पाहण्यासाठी सगळा गाव जमा झाला. शेतकऱ्याने आनंदाच्या भरात नगरातील लोकांना धान्य घेऊन जाण्यास सांगितले. मुबलक धान्याच्या साठ्यामूळे संपूर्ण नगरवासी आनंदी तर झालेच शिवाय श्री चक्रपाणि महाराजांचे स्तुति स्तवन करीत आपापल्या घरी परतले.

      एकूणच नगरातील रोग्यांना रोगमुक्त करणे, मुक्याला वाचा देणे, पांगळ्याला पाय देणे, आंधळ्याला नेत्र देणे, निर्धनाला धन प्राप्त करून देणे तर निपुत्रिकांना  पुत्रसंतती देणे अशा अनेक लीळेने दुखिताना दुःखमुक्त करून त्यांना प्रपंचात सुखी समाधानी केले.

 

०६) निवृत्त धर्माचा स्वीकार 

     प्रवृत्ती आणि निवृत्ती या जीवनाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रवृत्तीधर्म उपभोगाला स्वीकारतो तर निवृत्तधर्म उपभोगाचा त्याग करून निसंग होण्याचा प्रयत्न करत असतो. घटनानुक्रमाच्या माध्यमातून क्षणैक निवृत्तीचा विचार येणे ही सामान्य जनाची अवस्था असते तर त्याच घटनेपासून बोध घेऊन जाणिवेनं निवृत्तीचा मार्ग चोखाळणं हे खरं वैराग्य असतं. क्षणभरा पुरती विरक्तीची ओढ वाटणं हे स्मशान वैराग्य असतं. त्याला कदाचित परतीचा प्रवासही असू शकतो. पुनश्च मोहाच्या दर्शनाने पावलं वाकड्या वाटेने भोगवादाकडे वाटचाल करू शकतात. परंतु ज्ञान विवेकाने जेव्हा विरक्तीची भावना अनावर होते तेव्हा निरालंबनतेचा प्रवास सुरू होतो. शेवाळलेल्या मोहाच्या पलीकडचं स्थिरतेचं साम्राज्य खुणावू लागतं. अशा विरक्तीच्या भावनेतूनच राजपुत्र असलेल्या सिद्धार्थाचं रूपांतर मग स्थितप्रज्ञ अशा बुद्धा मध्ये होतं. मग त्या कडकडीत नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचा प्रशस्त असा प्रवास निवृत्तधर्मातूनच प्रारंभ होतो.

        मात्यापित्यांच्या देहावसना नंतर प्रपंच करत असताना त्यांच्या श्राद्धाच्या प्रसंग येऊन ठेपतो. एकादशीच्या दिवशी नगरातील विद्वान ब्राम्हणांना श्राद्ध भोजनाचे निमंत्रण श्रीचक्रपाणि महाराजांकडून पोहोचते. त्यादिवशी भूमीशयन वाड्नियमन आणि ब्रह्मचर्यव्रताचा विधी श्री चक्रपाणि महाराजांनी स्वीकारलेला असतो. श्राद्ध भोजनाचा विधी यथासांग संपन्न होतो. पण नेहमीच आज्ञेचे पालन करणारी आज्ञाधारक अशी धर्मपत्नी कमळाउसा मात्र त्या रात्री संसार सुखाची अपेक्षा घेऊन आग्रह करते. आनंदामध्ये रमलेल्या तृप्त काम परमेश्वराला तिच्या या अन्यथा आग्रहाचं हसू येतं. तेवढ्याच प्रसंगाला निमित्त करून श्रीचक्रपाणि महाराजांची आधीची विरक्तीची भावना आता दृढ होऊन प्रकर्षाने समोर येते. त्यांचं एकच घटनेतून प्रपंचाचा त्याग करून परमार्थाच्या वाटेनं जाण्यासाठी ते सिद्ध होतात.

       जगाच्या उद्धाराचा प्रपंच करणाऱ्या ईश्वराला स्वतःच्या प्रपंचात अडकून बसणं अवघडच असतं.अलंकाराच्या प्रसंगात राणी कमळाउसावर उदास झालेले श्रीहरीपाळदेव आणि श्राध्द भोजनी संसार सुखाच्या हट्टा पोटी उदास झालेले श्री चक्रपाणि प्रभू या दोन्ही अवतारांच्या या दोन्ही प्रसंगात विलक्षण साम्य आपल्याला दिसतं. तिला अलंकाराचा मोह आणि हिचा शरीरसुखाचा. म्हणूनच तर भाष्यकारांनी सुद्धा कनक आणि कामिनी या दोन मोहाच्या जागा दाखवून दिलेल्या आहेतया निसरड्या जागा अवचित क्षणी जीवनाच्या प्रवासाची दिशाच बदलून टाकतात. द्रव्यसंपत्ती आणि स्त्रीसंपत्ती या दोन्हींचा निषेध ब्रह्मविद्या शास्त्रात केलेला आढळतो ते याचमुळे. या दोन गोष्टींनी जर परमेश्वराच्या वाटचालीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. म्हणून साधकाने या बाबतीत सजग असायला हवं.

 फलस्थ नगरीतील अधिकारी जीवांना दानदातृत्व करून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी माहूरला निघालेल्या यात्रेकरूं समवेत श्री चक्रपाणि महाराजांनी प्रस्थान ठेवलं. वेशीद्वारा पर्यंत निरोप देण्यासाठी आलेल्या पत्नी आणि कुटुंबियांकडे नगरजनांकडे शेवटचा दृष्टिक्षेप टाकून आता त्यांचा माहुरचा प्रवास सुरू झाला. संसाराकडे पाठ आणि परमार्थाकडे मुक्ख करून  त्यांनी वाटचाल आरंभिली. दुर दुर चाललेली त्यांची पावलं आता पुन्हा कधीच या मार्गाकडे येणार नव्हतु. पण याची पुसटशीही जाणीव आसपासच्या कुणालाच लागलेली नव्हती. निवृत्तधर्माचं असं एकच तर ते स्पुल्लिंग होतं. पण त्यानं एवढं अनाकलनीय परिवर्तन त्यांच्या जीवनात केलं होतं. अशा निवृत्तीच्या विरक्त क्षणांची ओळख त्याला पटते तो खरंच भाग्यवंत ठरतो.

 

०७) स्विकरोनी ज्ञानशक्ती आरंभिले ज्ञानकार्या

      दरकोस दरमुक्काम करीत यात्रेकरूं समवेत श्रीचक्रपाणि प्रभू माहूर या ठिकाणी येऊन पोहोचले. दत्तगडा जवळून वाहणाऱ्या नदीमध्ये यात्रेकरूं समवेत मात्रास्नान करून ते पर्वताकडे निघाले. यात्रेमुळे अपार लोकांचा समुदाय तिथं एकत्रित जमला होता. देवदेवेश्वरीच्या मार्गे दत्तगडाच्या शिखराकडे यात्रेकरूंचा जथ्था निघालेला. चालताना कमरेला गुंडाळलेल्या धोतराचा सोगा खांद्यावर टाकून झपाझप पावलांनी श्रीचक्रपाणि प्रभू पुढे चाललेले. वाऱ्याने विस्कटलेले केस, गळ्यात जाणवं. उन्हानं लालसर झालेला गौरवर्ण. कपाळावरुन ओघळणाऱ्या घामाच्या धारा. शिखराच्या चढणीचा अवघड अरुंद मार्ग मोठाच बिकट. तेवढ्यात मोठ्यानं वाघाची डरकाळी सर्वत्र घुमली.लोक घाबरले. दैनावले.जीव वाचविण्यासाठी धडपड करू लागले. एकच धावपळ सुरू झाली. हलकल्लोळ माजला. प्रचंड आरडाओरडा सुरू झाला.हातात मिळेल ते घेऊन आडी दरडीचा झाडा फांद्यांचा आश्रय घेत लोक लपले. यात्रा विस्कटली.आता गर्दी पांगली होती आणि भयाण शांतता पसरली होती.

 

फक्त घोंघावणार्‍या वार्‍याचा आवाज आणि त्यामागून येणाऱ्या भल्यामोठ्या डरकाळ्या.थरथर कापणाऱ्या बायाबापड्या आठवेल त्या देवाचं नाव घेत होत्या.लेकरांच्या रडण्याचा आवाज तोंडावर हात ठेवून बंद करण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होत्या

        तेवढ्यात वेळूच्या जाळीतून भल्यामोठ्या डोक्याचा एक वाघ डरकाळी फोडत बाहेर निघाला.पाहणाऱ्यांची तर भितीनं गाळणच उडाली. श्रीचक्रपाणि महाराज मात्र रस्त्यातच खाली बसले.कारण नजरेनंच समोरून येणाऱ्या वाघाचं मूळ स्वरूप त्यांनी जाणलं होतं. आदिकारण श्रीदत्तात्रेय प्रभूंचं वाघाच्या रूपातील हे दर्शन श्री चक्रपाणी महाराजांना सुखावून गेलं.आनदंचं हास्य चेहऱ्यावर फुललं. गुडघे टेकून खाली वाकून विनम्रतेनं हात जोडून त्यांनी दंडवत केला. मागील दोन पायावर उभ्या झालेल्या वाघानं समोरील पायाचा एक पंजा श्रीचक्रपाणि महाराजांच्या श्रीमुकुटावर ठेवला. श्रीमुखा श्रीमुख लाविले आणि लख्ख प्रकाशाच्या वलयानं परिसर भरून गेला.

 धास्तावलेल्या नजरेने ते दृश्य पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी लपून बसलेली माणसं पण त्यांना हे कुठे माहीत होतं की दोन परमेश्वरावताराची भेट त्यांच्या प्रसन्नतेने आणि दिव्य दृष्टीनंच पाहता येणार होती. दोन अवतारांच्या अलिंगनातून परावर शक्तीच संक्रमण श्रीदत्तात्रेय प्रभू पासून श्रीचक्रपाणि प्रभूंनी स्वीकारलं. त्यापैकी परशक्ती अच्छादन करून आवर शक्तीद्वारे कार्य करण्याचे निश्चित केलं. थोडा वेळ दोन्ही अवताराची परस्परात परावाणीतुन संवाद झाला. मग व्याघ्र रूपातील श्रीदत्तात्रेय प्रभू अदृश्य झाल्यानंतर श्रीचक्रपाणि प्रभू देवदेवेश्वर येथे रात्रीच्या वास्तव्याला पोहोचले

      प्रतिदिनी मेरुवाळा तळ्यावर स्नान करावं. दोन्ही अवताराची जलक्रीडा व्हावी. मध्यानकाळी माहूर नगरीत  पाणीपात्राची भिक्षा करावी आणि पुन्हा त्याच तळ्याच्या काठावर भोजन करावं. रात्रीच्या वेळेला देवदेवेश्वर याठिकाणी निद्रा करावी. अशा नित्यचर्येला  प्रारंभ झाला. पाहता पाहता जवळजवळ सहा महिने उलटले.उध्दार  कार्याच्या दृष्टीने श्री दत्तात्रेय प्रभूंची आज्ञा घेऊन वैशाख पौर्णिमेसाठी द्वारकेला चाललेल्या यात्रेकरूंना समवेत श्री चक्रपाणि महाराज मार्गस्थ झाले ते द्वारकेच्या दिशेने. क्षौर करून संन्यास धर्माचं प्रतिपालन सुरू झालं. द्वारकेचा परिसरात विद्या दानासाठी असुसलेल्या जीवांच्या कणवेमूळे गोमती नदीच्या काठावरील द्वारकेत श्रीचक्रपाणि प्रभू येऊन दाखल झाले.

 

०८) दातृत्व विद्यासाधनाचे 

      माहूरला श्रीदत्तात्रय प्रभूं पासून परावर ज्ञानाचा स्वीकार केल्यानंतर पुढील ज्ञान दातृत्वाचा कार्याला प्रारंभ करणं आवश्यक होतं. अधिकारी जीवांच्या कणवा या दयाघनाला खुणावत होत्या. साद घालीत होत्या. श्रीदत्तात्रय प्रभूंची आज्ञा घेऊन वाडवडिलांच्या कर्मभूमीत जाण्याचा मग त्यांनी निश्चित केलं. खरंतर द्वारका म्हणजे ईश्वर मार्गाकडे जाण्याचं मुख्य द्वार. श्रीकृष्ण भगवंताने जे निर्माण केलं अशी परम पवित्र जागायुगानयुगे मातेच्या प्रेमाला पारखी झालेली लडिवाळ पोर ज्या ओढीनं मातेला बिलगते त्याच अनामिक ओढीने अथांग सागराला भेटणार्‍या गोमती नदीच्या काठावर वसलेली ही द्वारावती नगरी.जणू वात्सल्यानं भेटणाऱ्या माय लेकींच्‍या भेटीचं अमृतपान करणारी ही भाग्यवंत नगरी. सागराच्या अन् नदीच्या भेटीनं त्या स्थळाला आलेलं मांगल्य आणि तेथील श्रीचक्रपाणि महाराजांच्या वास्तव्यानं लाभलेलं पावित्र्य असा हा दुग्धशर्करा योग.अनेक देवदेवतांची भव्य मंदिरं. त्यांची प्रशस्त देवालयं. उंचच उंच शिखरं.गगनात डौलाने फडकणाऱ्या पताका. संपूर्ण आर्यावर्तातील भाविक भक्तांसाठी काशी क्षेत्रापेक्षा ही महत्त्वपूर्ण असणारं हे धर्मपीठ. मंदिराच्या परिसरात भाविकांच्यासाठी उभारलेल्या देखण्या धर्मशाळा. वेदांचं पठण आणि त्यातील ऋचांचं परिज्ञान करविणाऱ्या उत्तम वेदशाळा. यात्रेकरूंच्या सततच्या वर्दळीनं वाढलेली दाट लोकवस्ती. दैनिक गरजांच्या परिपूर्तीसाठी भव्य बाजारपेठा. त्याच्या लगतच दाटीवाटीने अंग चोरून उभी असलेली हातविक्रेत्यांची छोटी-छोटी दुकानं. एकूणच भाविक भक्तांच्या जनजीवनाला पावित्र्याचा सुगंध प्रदान करणारी ही पौराणिक द्वारावती नगरी.

    प्रसिद्ध अशा नारायण मंदिराच्या पाताळ गुंफेत श्रीचक्रपाणि महाराजांचं वास्तव्य सुरू झालं. ज्या जीवांना दातृत्व करायचं त्यांच्या अधिकारासाठी प्रातकाळी चाललेली प्रभूंची ध्यानसाधना. स्नानादी कर्म केल्यानंतर द्वारावती नगरीची ग्रामस्वच्छता. अगदी मध्यानकाळी नगरातील चातुर्वर्णात केलेली भिक्षा. गोमती नदीच्या काठी भोजन.तर दुपारच्या वामकुक्षी नंतर परावाणीतून उपस्थितांना निरूपण. अशी सर्व व्यस्त असलेली श्रीचक्रपाणि महाराजांची ही दिनचर्या

 

विद्यासाधनासाठी लागणाऱ्या अधिकाराची पात्रता असलेल्या जीवांना त्यांच्या योग्यतेनुसार देवतांच्या विद्यासाधनांचे दातृत्व प्रभू करायचे. अधिकारभेदे आलेल्या पुरुषांच्या डोक्यावर सुप ठेवून आणि वरून खराटेनी आघात करुन पात्रतेप्रमाणे अंतर्याग  किंवा बहिर्याग या देवता साधनांचे दातृत्व करत असायचे. सुपेनि आघात करायचे त्यांना बहिर्याग तर खराट्याचा स्पर्श करताच अंतर्याग साधन प्रकटत असत. आपल्या ६३ वर्षाच्या द्वारकेतील वास्तव्यात ५२ साधकांना स्थुळविद्या तर ८४ साधकांना शिल्पविद्यांचं दातृत्व करणारा असा हा महादानी श्रीचक्रपाणि प्रभूंचा अवतार.

 

०९) अभियान ग्रामस्वच्छतेचे 

    मानवी जीवनाला लौकिकदृष्ट्या आधारभूत झालेली भूमी म्हणजेच ही पृथ्वी. या पृथ्वीवरील वास्तव्याच्या आधारानेच जीवजगत विस्तारत असते. पृथ्वीच्या सहचार्यानेच मानवाच्या जीवनात पारमार्थिक उद्धाराचा महामार्ग आकाराला येत असतो. म्हणून या भूमीला कर्मभूमी असेही म्हटले जाते. या भूमीवर कर्माचं कर्तृत्व करायचं असतं आणि त्या कर्म अर्जकत्वातूनच चतुर्विध कर्मफळाची पात्रता जीवाला प्राप्त होत असते. आत्मोद्धारासाठी ज्या भूमीत कर्म करायचे आहे ते कर्म स्वच्छ आणि नितळ असले पाहिजे. धर्मभावनेने केलेले कर्म हे शुद्ध असते ही पण ज्या ठिकाणी कर्म केले ती भूमी जर अस्वच्छ असेल तर तिथे स्वच्छ कर्म कसं निष्पन्न होणार? स्वच्छ कर्म करण्यासाठी लागणारी शुद्ध ऊर्जा तिथं कशी प्राप्त होणार? शुद्ध कर्म करण्यासाठी कर्त्याचा आरोग्य कसं व्यवस्थित राहणार? एकूणच उद्धारासाठी आधारभूत ठरणाऱ्या या भूमीची स्वच्छता म्हणजेच पर्यावरणाची निगा राखली ती श्रीचक्रपाणि प्रभूंनी.

    अस्वच्छतेने द्वारावती नगरीतील जनजीवन धोक्यात आलेले होतं. तिथं आरोग्यासाठी स्वच्छतेची गरज होती. द्वारकाधीशानं  आपल्या सामर्थ्यतून सुवर्णनगरी निर्माण केली खरी पण मानवानं मात्र स्वतःच्या वर्तनातून तिचं पावित्र्य भंग केलं होतं.

 द्वारकाधीश तुझ्या सामर्थ्याने द्वारका निर्माण केली रे बाबा पण तिच्या स्वच्छतेचं काय? कारण तू तर निर्माण करून मोकळा झालास पण आता तिच्या व्यवस्थेचं काय? कारण निर्माण करण्यासाठी सामर्थ्य असावं लागतं ते तुझ्यात होतं ही रे. पण आता स्वच्छतेसाठी तिथं सामर्थ्याची गरज नव्हती. तिथं तुझं सुदर्शनचक्र ही कुचकामी ठरलं असतं. इथल्या स्वच्छतेसाठी गरज होती कौशल्यपूर्ण झाडण्याची. सूप आणि खराटा ही स्वच्छतेसाठी लागणारी ती दोन अस्त्र होती. या दोन अस्त्रांच्या सुयोग्य वापरासाठी लागणार होते दोन सक्षम हात आणि एक खंबीर मन. ही गरज ओळखली श्री चक्रपाणि प्रभूंनी आणि केली सुरुवात स्वच्छतेच्या अभियानाची. आजच्या ग्रामस्वच्छतेचा अभियानाची बीजं सापडतात ती अकराव्या शतकातील द्वारकेच्या मातीत.महाराष्ट्राच्या मातीतून  द्वारकेत गेलेल्या या अवताराने स्वच्छतेची मोहीम राबवून केला निर्माण एक दैदिप्यमान इतिहास. याची पानं देतील साक्ष येणाऱ्या असंख्य पिढ्यांना आणि सांगतील मूलमंत्र स्वच्छतेचा. कारण आधी सिद्ध व्हा.मग शुद्ध व्हा. मग बुद्ध व्हाल. मग आपोआपच प्रसिद्ध ही व्हाल.

      भल्या पहाटे उठावं आणि निघावं हातात घेऊन सूप खराटा. करण्यास स्वच्छ परिसर.भरावा केरकचरा सुपात आणि करावा विसर्जित गोमतीच्या पात्रात. असा हा नित्याचा दिनक्रम श्री चक्रपाणी प्रभूंचा. कुठे ही जाहिरात नाही की कुठे फोटोसेशन नाही. किंवा कुठे स्वच्छतेवर कीर्तन नाही. फक्त आणि फक्त आहे ती कृती स्वच्छतेची. ती होत नाही शब्दांनीतिथं असते फक्त गरज ती स्वच्छतेच्या कृतीच्या.असा हा स्वच्छतेचा कृतिशील आदर्श दाखविणारा विलक्षण अवतार.

 

१०) श्रीचक्रपाणि महाराजांच्या अवतारकार्याची तत्वमिमांसा 

 

     महानुभाव संप्रदायाच्या तत्वप्रणालीनुसार सृष्टीमध्ये परमेश्वर १६ वेषी अवतार धारण करुन अधिकारानुरुप जीवाचा उद्धार करतात . त्यापैकी श्रीचक्रपाणी महाराजांनी फलटण येथे कऱ्हाडे ब्राह्मणाच्या घरी जनकनायकांपासुन जनकाईसाच्या उदरी गर्भीचा अवतार धारण केला.त्यातून  मातेला मुख्य विष्णुचे तर पित्याला विष्णुच्या पत्नीचे फळ प्राप्त करून दिले. याशिवाय  संबधाचे भजनाचे पृथक पृथक फळे घडविले३६ व्या वर्षी रामयात्रेच्या निमित्ताने माहूरला बीजे केल्यावर तेथे श्रीदत्तात्रयप्रभूंनी व्याघ्रवेषात त्यांना भेट दिली. तिथेच श्रीचक्रपाणि महाराजांनी श्रीदत्तात्रेय प्रभूंना निमित्त करून पर आणि अवर म्हणजेच उभय शक्तीचा स्वीकार केला. परशक्तीचे कार्य लोपुन अवर शक्तीचे कार्य प्रगट केले. मग तेथून श्रीचक्रपाणि महाराजांनी पुढील कार्यासाठी द्वारकेस गमन केले.

.       द्वारकेच्या ६३ वर्षांच्या श्रीचक्रपाणि महाराजांनी आधिकारानुरुप अनंत जीवांना लीळा, संबंध, ग्रहणा अशा तिन्ही दानाचे दातृत्व केले .लीळादान म्हणजे अनार्जित दान. कर्म आर्जकत्वाच्या वेगळे केलेले दान.

 

तर ग्रहणा म्हणजे तयाची सिधे घेउनि तयासिची देणे.त्यांच्याच भाग्यात असलेले परंतु काहीतरी अडथळा असल्यामुळे थांबलेले दान त्याला प्राप्त करून देणे. संबंधदान म्हणजे परमेश्वर अवताराचा एखाद्या जीवाला एकदा स्पर्श झाला असता भोगभूमीत एक हजार वर्षाचे भोग विशिष्ट मनुष्यदेह प्राप्त होते तथा दोन पेक्षा अधिक वेळा स्पर्श झाला असता भोगभूमीत दहा हजार वर्षाचे मनुष्यदेह प्राप्त होते.

       अशा प्रकारे अवर शक्तीचे कार्य प्रकटल्यामुळे  श्रीचक्रपाणि महाराजांपासून लीळा, संबंध, ग्रहणा या तिन्ही दानाचे अनंत जीवांना दातृत्व वर्तले.

  श्रीचक्रपाणि महाराजांपासून मुख्यता सुपेनी मार्ग आणि खराटेनि विद्याचे दातृत्व वर्तत होते.परमेश्वर अवतार जेथे उद्धरण कार्य करत असतात तेथे अधिकारी जीवाचे संपादकत्व माया करते. श्रीचक्रपाणि महाराज जेव्हा खराटेने द्वारकेच्या बीदी म्हणजेच दोन आळीतील मोकळी जागा आणि गोदरी म्हणजे चौक झाडायचे तेणे करुन जडत्वीच्या जीवाना संबंधदान किंवा  दुख निवृती करायचे. सुपामध्ये केरकचरा भरताना त्यांना दृष्टीने अवलोकुन तो केरकचरा गोमती नदीमध्ये टाकायचेत्यामूळे जीवाना मुख्य फळी म्हणजे चिज्जड मायेच्या फळी पावण करायचे. सुपेनी मार्ग म्हणजे सकळ बहिर्यागी म्हणजे चारी युगाचे चार बहिर्याग. एंव कृतयुगीचा आत्मोपास्ती बहिर्याग , त्रेतियुगीचा भक्ती बहिर्याग , द्वापारयुगीचा  यज्ञ बहिर्याग आणि कळियुगीचा तीर्थ, क्षेत्र , व्रत , दान हा बहिर्याग असे सकळ देवतांच्या बहिर्यागाचे दातृत्व करायचे. खराटेनि विद्या म्हणजे ऐक्याशी कोटी सव्वा लक्ष दहा देवतेंच्या विद्या देती .श्रीचक्रपाणि महारांजापासुन बावन्न पुरुषाना स्थुळ विद्येचे म्हणजे ब्रह्मादिका पासुन चैतन्य मायेपर्यंतच्या विद्याचे दातृत्व वर्तले तर ८४ पुरुषांना शिल्पविद्येचे म्हणजे कर्मभुमी पासुन ते स्वर्ग स्थानीच्या देवतांच्या विद्याचे दातृत्व वर्तले. त्यापैकी दुंडी राउळांना खराटेनी हाणीतल्यामूळे त्यांना सकळ देवतांचे मंत्र येवो लागले..

          अशा प्रकारे श्रीचक्रपाणि महाराजांनी अनंते चरित्रे केली म्हणजे लोकाची , अनंत लीळा केलीया म्हणजे आलौकीक आणि अनंता उद्धरीले म्हणजे तिन्ही लीळा , संबध ,ग्रहणा दानाचे दातृत्व केले

 

११) समारोप

       महानुभाव पंथातील पंचकृष्ण अवतार परंपरेतील तिसरा अवतार हा श्रीचक्रपाणि प्रभूंचा. श्रीदत्तात्रेय प्रभू पासून ज्ञानशक्ती स्वीकारून ज्ञान परंपरेचा वारसा वृद्धिंगत करणारा हा पर आच्छादनीचा अवरदृश्य अवतार. ही ज्ञानपरंपरा पुढे अव्याहत चालावी म्हणून ऋध्दपुराहून द्वारावतीला आलेल्या श्रीगोविंद प्रभुंना गोमतीच्या वाळवंटात परावर शक्तीचे दातृत्व केले. सनातन काळापासून चालत आलेला हा उद्धारक विचारांचा वारसा श्रीचक्रपाणि महाराजांनी स्वतः स्वीकारला जोपासला आणि पुढे अग्रेषित ही केला. म्हणून श्रीचक्रपाणि प्रभू हे पंचकृष्ण अवतार परंपरेतील एक महत्त्वपूर्वक दुवा आहेत हे लक्षात घेणे अगत्याचे आहे.

       लौकिक दृष्टीने जनसामान्यांच्या संसारातील व्यथा वेदनांवर फुंकर घालत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणारा हा दयाघना अवतार. अधिकारी जीवांना लीळा , संबंध , ग्रहणेचं दातृत्व करीत त्यांच्या परलौकिक उद्धाराचा महामार्ग सिद्ध करणारा हा उद्धारक अवतार. एकूणच लौकिक आणि पारलौकिक दोन्ही स्तरांवर कार्य करून सर्वांच्या धर्म श्रद्धेला पात्र ठरणारा हा आनंदनिधान  अवतार. त्यांच्या लीळाचिंतनाने नामस्मरणाने आपल्याही पारत्रिक अधिकाराची सुवर्ण पहाट उगवेल हे मात्र निश्चित.

 

 

पू.श्रीसुरेशराज राहेरकर (एम..बी.एड्.)

श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था

श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव

या.फलटण,जि.सातारा.

९९२१११९२८५

 

Comments